पुणे – कॉपीबहाद्दर 7 विद्यार्थ्यांना वर्षभर परीक्षाबंदी

टंकलेखन व परीक्षेचा 75.63 टक्के निकाल

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या टंकलेखन व लघुलेखन परीक्षेचा निकाल 75.63 टक्के लागला आहे. यात सात विद्यार्थ्यांनी कॉपी केली असून यांना एक वर्ष परीक्षांसाठी बंदी (डिबार) घालण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेमार्फत 4 ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा घेण्यात आल्या. याचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून परिषदेच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रके व निकालाच्या प्रती सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुंबईसाठी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयामार्फत संबंधित टंकलेखन संस्थांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या टंकलेखन संस्थामधून कार्यालयीन वेळेत ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण 1 लाख 277 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यात 86 हजार 700 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित तर 13 हजार 577 अनुपस्थित होते. यातील 65 हजार 573 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 34 हजार 319 अनुत्तीर्ण झाले आहेत. पूर्व अट पूर्तता न केलेल्या 378 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. परीक्षेचा एकूण निकाल 75.63 टक्के लागला आहे.

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी परीक्षार्थीनी आपल्या संस्थेतून ऑनलाईन अर्ज करणे आवश्‍यक आहे. गुणपत्रिकेसाठी प्रति विषय शंभर रुपये व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी प्रति विषय चारशे रुपये याप्रमाणे शुल्क भरण्यासाठी येत्या 6 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टंकलेखन परीक्षा सविस्तर निकाल
टंकलेखन परीक्षेला 87 हजार 625 विद्यार्थ्यांची अर्ज भरले होते. यातील 75 हजार 582 विद्यार्थी उपस्थित तर 12 हजार 43 विद्यार्थी अनुपस्थित होते. यातील 59 हजार 648 विद्यार्थी उत्तीर्ण तर 27 हजार 810 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 162 जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. सात जणांना डिबार करण्यात आले आहे.

लघुलेखन परीक्षा सविस्तर निकाल
लघुलेखन परीक्षेसाठी 12 हजार 652 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यात 11 हजार 118 विद्यार्थी उपस्थित तर 1 हजार 534 अनुपस्थित होते. यातील 5 हजार 925 विद्यार्थी उत्तीर्ण तर 6 हजार 509 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यातील 218 जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.