पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत प्राणवायूला मागणी
पुणे – मागील आठ दिवसांत पुणे विभागात सक्रिय करोना बाधिताचीं संख्याही काहीशी कमी झाली असली, तरी ऑक्सिजनच्या मागणीत मात्र वाढ झाली आहे. जवळपास शंभर मेट्रिक टनाने ऑक्सिजन मागणी वाढली असून, त्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत 10 ते 20 मेट्रिक टनांनी मागणी वाढली आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत 30 ते 35 मेट्रिक टनांनी ही मागणी वाढलेली आहे. विभागात एकूण मागणीच्या तुलनेत 85 टक्के ऑक्सिजन पुरवठा होत आहे.
विभागामध्ये आठ दिवसांपूर्वी 511.6 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. तर त्यातील 399.06 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता. मागणीच्या तुलनेत 22 टक्के कमी मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता. गेल्या आठ दिवसांमध्ये केवळ पुणे जिल्ह्यात चार ते पाच हजारांनी सक्रिय बाधित संख्या कमी झाली आहे.
तर, अन्य जिल्ह्यांमध्ये सक्रिय बाधित संख्या दोन ते चार हजारांनी वाढली आहे.
प्रामुख्याने ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची दररोज दमछाक होत आहे. अशा परिस्थितीतही रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन पुरवठाबाबत दिवस-रात्र काम करत आहे.