पुणे – बँगलाेर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याचे सुमारास एका कंटनेरला भीषण अपघात हाेऊन ताे रस्त्यावर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कंटनेरचा चालक जखमी झाला असून सदर अपघातामुळे दाेन किलाेमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना ताटकळत रहावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
बँगलाेर-मुंबई महामार्गावरुन साताराच्या दिशेने एक कंटनेर मुंबईकडे मंगळवारी सकाळी जात हाेता. कात्रज बाेगदा पार केल्यानंतर नवले ब्रीजच्या दिशेने कंटनेर येत असताना पुल संपल्यानंतर उतारावरुन वेगाने आल्याने कंटनेर चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कंटनेरचा पाठीमागील बाजूस असलेला ट्रेलर केबीनवर आदळून गाडी दुभाजकावर धडकून कंटनेर रस्त्यावरच पलटी झाला. या घटनेत कंटनेरचा चालक गाडीखाली आडकल्याने त्याला बाहेर पडणे अवघड बनले.
अखेर नागरिक व पाेलीसांचे मदतीने वाहनचालकास गाडीच्या बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पाेलीसांनी तात्काळ तीन ते चार क्रेन घटनास्थळी घेऊन येत अपघातग्रस्त कंटनेर रस्त्याचे बाजूला केला आणि वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळीच ऐन गर्दीच्या वेळी अपघात झाल्याने वाहनाचे लांबपर्यंत रांगा लागल्या हाेत्या.