पुणे : कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगला मनुष्यबळच नाही

सगळी भिस्त सॅनिटरी इन्स्पेक्‍टर, उपनिरीक्षकांवरच

पुणे – करोना बाधितांच्या कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगला मनुष्यबळच नाही; सगळी भिस्त सॅनिटरी इन्स्पेक्‍टर आणि स्वच्छता उपनिरीक्षकांवरच असल्याची सध्याची महापालिकेतील आरोग्य विभागाची स्थिती आहे.

करोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असून, नागरिकांना याचे गांभीर्यच उरले नाही. पूर्वी बाधित सापडला तर त्याला “कम्पल्सरी’ आयसोलेशन सेंटर, केअर सेंटर किंवा रुग्णालयात उपचरासाठी दाखल केले जात होते. रुग्ण राहतात, त्या भागात सील करून सॅनिटायझेशन केले जात होते. त्या भागात भीती निर्माण होऊन नागरिक स्वत:च्या चलनवलनावर बंधन घालून घेत होते, काळजी घेत होते.

मात्र, आता शेजारी रुग्ण असेल, तरी त्याचे गांभीर्य फारसे पाळले जात नसल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर क्वारंटाइनचे शिक्के असलेले तसेच लक्षणे नसलेले; परंतु बाधित असलेले रुग्ण स्वत:ही बाजारपेठांमध्ये फिरतात. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे.

आवश्‍यक आहे 20 जणांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग!
सरकारच्या आदेशानुसार एका बाधितामागील 20 जणांचे “कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग’ होणे अनिवार्य आहे. त्यामध्ये पाच “हायरिस्क’ (घरातीलच व्यक्ती) आणि अन्य 15 “लो रिस्क’ (अन्य संपर्कातील) यांचा समावेश आहे. मात्र, सध्या एका निरीक्षकाकडून 17 च ट्रेसिंग होत आहे. याशिवाय एकूणच “ट्रेसिंग’साठी मनुष्यबळ नसल्याने हव्या त्या प्रमाणात ते होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

लॉकडाउनवेळी अत्यावश्‍यक वगळता, सर्व सेवा बंद करण्यात आल्या. त्यामुळे पीएमपीएमएल, शिक्षक, घनकचरा आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना “कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग’चे काम दिले. त्यावेळी वेगाने ते काम होत होते कारण मनुष्यबळही मोठे होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आणि जगरहाटी पुन्हा सुरू झाल्यानंतर वरील चारपैकी तीन विभागातील कर्मचारी आपापल्या कामावर पूर्ववत रुजू झाले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या तुटपुंज्या मनुष्यबळावर “कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग’चे काम पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा मनुष्यबळाचे संकट प्रशासनासमोर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.