8 मार्ग बंद करण्याच्या हालचाली
पुणे – एसटी महामंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या “शिवशाही’ चा प्रकल्प अडचणीत आला आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यात तब्बल दहा मार्ग बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार वीस मार्गांच्या सर्व्हेक्षणात तब्बल आठ मार्ग “डेंजर झोन’ मध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे मार्ग बंद करायचे अथवा नाही याबाबत मुख्य कार्यालयाकडे सल्ला मागितला आहे.
खासगी बसेसला टक्कर देण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाच्या वतीने तीन ते चार वर्षांपूर्वी शिवशाही, अश्वमेध आणि हिरकणी या आरामदायी तसेच वातानुकूलित बसेस ताफ्यात आणल्या आहेत. त्याशिवाय शिवशाहीची स्लिपर कोच बसही ताफ्यात आणल्या आहेत. या बसेस वातानुकुलित असल्याने त्यांचे दरही जास्त ठेवण्यात आले आहेत. मात्र, जादा दरामुळे या बसेसच्या प्रवासी संख्या कमी झाल्याने हा प्रकल्पच अडचणीत आला होता. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाच्या वतीने या बसेसचे दर कमी करण्यात आले आहेत, हे असतानाही या बसेसचा महसूल अपेक्षित वाढ झालेली नाही.
त्यामुळे गेल्याच महिन्यात दहा मार्ग बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य मार्ग अडचणीत येऊ नये आणि आणखी तोटा वाढू नये यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत, त्यासाठी महामंडळाच्या वतीने वीस मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याच्या अहवालात आठ मार्गांवर अपेक्षित निधी मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे, ही बाब लक्षात घेऊन या मार्गाच्या संदर्भात मुख्य कार्यालयाच्या वतीने स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.