पुणे – पुणेकरांना दिलासा

बाधितांच्या दुप्पटजण झाले करोनामुक्‍त

पुणे -गेल्या काही दिवसांपासून आटोक्‍यात न येणारी बाधितांची संख्या गेल्या चार-पाच दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर बाधितांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण बाधितांपेक्षाही दुप्पट होते. नकारात्मक बाब म्हणजे एकूण मृतांच्या संख्या सात हजार पार झाली आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच हजारांच्यापेक्षा जास्त बाधितांची संख्या आढळत होती. अगदी सात हजारांपर्यंत बाधित सापडले होते. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.

गेल्या चोवीस तासांत नवीन 2 हजार 879 नवीन बाधित रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 3 हजार 678 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील 61 रुग्णांसह 82 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही कमी झाली असून, मंगळवारी ती 39 हजार 839 नोंदवली गेली. एप्रिलमध्ये ही संख्या 55 हजारांवर पोहोचली होती. दरम्यान सक्रिय रुग्ण कमी होत असले तरी गंभीर रुग्णांची संख्या मात्र कमी होत नाही. मंगळवारी 1 हजार 413 पर्यंत वाढली असून, बाधित मृतांची संख्याही सातत्याने 80 पेक्षा जास्तच असल्याने बाधितांची संख्या जरी कमी झाली असली तरी अजूनही धोका मात्र कमी झाला नाही, हेच दिसून येते.

शहरात आतापर्यंत 4 लाख 33 हजार 89 नागरिक बाधित झाले असून, त्यापैकी 3 लाख 86 हजार 196 नागरिक बरेही झाले आहेत. तर मंगळवारी नोंदवलेल्या मृतांच्या आकडेवारीचा समावेश केल्यानंतर मृतांची संख्येने सात हजारांचा टप्पा पार केला आहे.
ती संख्या 7 हजार 54 वर पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 15 हजार 98 नागरिकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.