पुणे – रिंगरोड उभारणीसाठी विविध पर्यायांवर विचार

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रिंगरोड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रिंगरोड उभारण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. यामध्ये बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा), रिंगरोड भोवती टीपीस्किम (नगर रचना योजना), जागतिक बॅंकांकडून कर्ज अथवा राज्य आणि केंद्राकडून निधी प्राप्त करून घेणे असे ते पर्याय पुढे आले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसीच्या रिंगरोडची लांबी सुमारे 166 कि.मी आहे. शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यांतून रिंगरोड जाणार आहे. यासाठी 2300 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता आहे. प्रस्तावित असलेल्या पुरंदर विमानतळावर जाण्यासाठीचा मार्ग आणि पीएमआरडीएच्या रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून नव्याने सर्वेक्षण करून रिंगरोडची आखणी एमएसआरडसीकडून करण्यात आली आहे. नव्याने आखण्यात आलेल्या रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यामुळे तो राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा निधी कसा उभारावा, त्यासाठी काय पर्याय आहेत, याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एमएसआरडीसीकडून विचार सुरू आहे. त्यामध्ये वरील चार पर्याय पुढे आले असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यापैकी एक पर्याय निश्‍चित करून लवकरच याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.