पुणे – विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसच्या वाट्याला असल्याने त्या जागी भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसला आणखी बळ मिळणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी राज्यपालांकडे काही मागण्या केल्या होत्या. यात विधानसभा अध्यक्षपदावर तातडीने निवड व्हावी, अशी एक मागणी होती. त्यानुसार राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात विधानसभेला नव्याने अध्यक्ष मिळणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारकडून स्पष्ट झाले आहे. या पदासाठी कॉंग्रेसकडून नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांची नावं चर्चेत होती;
मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी हुकलेल्या आमदार संग्राम थोपटे यांच्या नावावर ऐनवेळी कॉंग्रेस हायकमांडनं शिक्कामोर्तब केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील थोपटे यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.
मध्यंतरी या पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा सांगितला होता; परंतु खुद्द शरद पवार यांनीत तो खोडून काढला. बाळासाहेब थोरात यांनीही “या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष निवडले जाणार असून ते कॉंग्रेसचे असतील,’ असं सांगितलं. संग्राम थोपटे यांनीदेखील थोरात यांची भेट घेतली होती. त्या बैठकीतील आमदारांनीही थोपटे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
…तर मंत्रिपद निश्चित
जे नाव चर्चेत असते, त्यापेक्षा अन्य नाव ऐनवेळी घोषित करण्याची कॉंग्रेस हायकमांडची परंपरा आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर थोपटे यांची वर्णी न लागल्यास त्यांची मंत्रीपदी नक्की वर्णी लागू शकते. त्यामुळे पुणे जिल्ह्याला चौथा मंत्री मिळू शकतो, ही शक्यताही नाकारता येणार नाही.