पुणे – कॉंग्रेसने मागविले इच्छुकांचे अर्ज

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर कॉंग्रेसकडून इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. दि.6 जुलैपर्यंत हे अर्ज सादर करण्याची मुदत असून हे सर्व अर्ज दि.15 जुलैपर्यंत प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्यात येणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत लढणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदेश कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यापूर्वी 2009 मध्ये दोन्ही पक्षांकडून चार जागा लढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आघाडीतील जागा वाट निश्‍चित झालेले नसले तरी, पक्षाकडून सर्व विधानसभांसाठी हे अर्ज मागण्यिात आले आहेत.

उमेदवारी अर्ज भरताना सर्वसाधारण वर्गासाठी पंधरा हजार रुपये, तर मागासवर्गीयांसाठी (अनुसूचित जाती-जमाती) दहा हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले असून ही रक्कम पक्षनिधी म्हणून डी.डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे जमा करण्यात येणार आहे, असे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.