पुण्याचा कॉंग्रेसचा उमेदवार आज ठरणार?

दिल्लीत केंद्रीय निवड समितीची बैठक


ज्येष्ठ सदस्यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

पुणे – राज्यातील कॉंग्रेस उमेदवारांचे नावे अंतीम करण्यासाठी दिल्लीत केंद्रीय निवड समितीच्या बैठका सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत अद्याप पुण्याच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित झाले तरी, शनिवारी उमेदवाराच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्यान, कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी थेट पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसच्या दिखामदार परंपरेला साजेसा व निष्ठावान कार्यकर्त्यालाच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ सदस्य उल्हास पवार, गोपाळ तिवारी आणि बाळासाहेब शिवरकर यांनी हे पत्र लिहले असून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

पक्षाकडून राज्यातील पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुंबई आणि नागपूरच्या उमेदवारांचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनेही आपल्या 2 याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातच, अर्ज भरण्यास अवघा आठवड्याभराचा कालावधी शिल्लक असल्याने दिल्लीत पक्षाचे उमेदवार अंतीम केले जात आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुण्याच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता असल्याने, कॉंग्रेसच्या इच्छुकांनी दिल्ली गाठली होती. त्यात, मोहन जोशी यांच्यासह कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले शेकापचे नेते प्रविण गायकवाड हे दिल्लीत असल्याची चर्चा आहे. तर, खासदार संजय काकडे हे बैठकी आधीच वरिष्ठांशी भेट घेऊन पुण्यात परतले असल्याचे बोलले जात आहे. तर अरविंद शिंदे पुण्यातच आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमधील पुण्याच्या उमेदवार निवडीला वेग आला असून लवकरच उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे.

निष्ठावंताचे तिसरे पत्र
पक्षाच्या निष्ठावंतालाच उमेदवारी द्यावी म्हणून शहर कॉंग्रेसच्या वतीने पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आणखी एक पत्र कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना दोन दिवसांपूर्वी पाठविले आहे. यापूर्वी एक पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा शहर कॉंग्रेसच्या बैठकीत ठराव करून राष्ट्रीय नेतृत्वाला पाठविण्यात आला होता. तर आता केंद्रीय निवड समितीच्या बैठकीच्या एक दिवस आधी आणखी एक पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात दिखामदार परंपरेला साजेसा व निष्ठावान कार्यकर्त्यालाच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच, पक्षाने निष्ठावान कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांचे मत घेतल्यास त्यांच्याकडून निश्‍चितच योग्य नाव दिले जाईल. त्यामुळे पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.