पुणे – खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्याने बाबा भिडे पूल, झेड ब्रिज, पूना हॉस्पिटलजवळील पूल आणि नदीपात्रातील रस्ता बंद करण्यात आला होता. याबाबत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कबुली दिली आहे. भिडे पूल आणि टिळक पूल दोन्ही पाण्याखाली गेले होते. तर पूना हॉस्पिटल येथील पुलावरुन शाळकरी मुलगा पडल्याची दुर्घटना घडली होती.
तसेच झेड ब्रिजखाली तीन व्यक्ती शॉक लागून मृत्यूमुखी पडल्या. यामुळे खबरदारी म्हणून हा पूल आणि रस्ताही बंद करण्यात आला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली. तर, शहरात पडलेले ५५४ मोठे खड्डे, हे ही वाहतूक कोंडीचे कारण बनले होते. हे खड्डे दोन दिवसांत बुजवण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
‘ते’ कर्मचारी गोत्यात
वाहतूक कोंडीच्या वेळी जे पोलीस कर्मचारी चौकात कार्यरत नव्हते, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक कोंडी झालेल्या चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे.