पुणे – निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्राधान्य आहे. या दृष्टिकोनातून निवडणूक यंत्रणा विविध टप्प्यांवर आवश्यक खबरदारी घेत आहे. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ तर 8 हजार 462 मतदान केंद्र आहे. तर या निवडणुकीसाठी सुमारे 62 हजार इतके कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा विधानसभा मतदारसंघाचे वाटप करण्यात आले आहे. तर कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबरला होणार आहे. याच दिवशी कर्मचाऱ्यांना आपले नियुक्ती कोणत्या मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे, याची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर चार कर्मचाऱ्यांचे पथक शासकीय वाहनाने नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होणार आहे.
विधानसभेसाठी दि.20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, कर्मचाऱ्यांचे अंतिम प्र्शिक्षण 19 नोव्हेंबरला होणार आहे. दि.18 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र वाटपासाठी सरमिसळीकरण अर्थात रण्डमायझेशन प्र्क्रिया करण्यात येणार आहे.
मतदान अधिकाऱ्यांच्या यादीचे निवडणूक आयोगाच्या परराज्यातील निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये सरमिसळीकरण केले जाते. त्यामुळे कोणत्या कर्मचाऱ्यास कोणत्या मतदान केंद्रावर निवडणुकीच्या कामासाठी जावे लागणार हे मतदान केंद्रावर जाण्यास पथके निघतात तेव्हाच कळते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
यंत्रांचे सरमिसळीकरण…
मतदान केंद्रासाठी कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट यांचे सरमिसळीकरण होते आणि कोणत्या मतदान केंद्रावर कोणकोणत्या कर्मचाऱ्या जवळ कोणते मशिन्स जाणार यांचे संगणकाद्वारे वाटप होते. मतदान यंत्र संच घेऊन मतदान पथक मतदान केंद्रावर जायला निघतात, तेव्हा राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींसमोर गोडाऊन उघडले जाते आणि सरमिसळीकरण नुसार तिन्ही मशिन्स मतदान अधिकाऱ्यांच्या पथकाकडे सुपुर्द केली जातात.
ही प्रक्रिया राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींसमोर केली जाते व त्याबाबतचे इतिवृत्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीसह जतन केली जाते. कोणत्या नंबरचे कोणते मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार त्याची यादी उमेदवारांना दिली जाते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.