पुणे – लग्न जमवताना दिलेली खोटी माहिती पुढे पती-पत्नी यांच्यातील वादाला कारण ठरत आहे. बर्याचदा हे वाद नात्यातील वडीलधार्यांकडून मिटवले जातात. तर, कित्येकदा हे वाद थेट कौटुंबिक न्यायालयात जात आहेत. आर्थिक स्थिती, लपविलेले आजारपण, शिक्षणाबद्दल दिलेली खोटी माहिती आणि अनैतिक संबंध अशी ही लपवाछपवीची कारणे घटस्फोटाच्या मागणीची ठरत आहे.
अ’ॅरेंज मॅरेज हे बहुतांशवेळा मध्यस्थीमार्फत ठरविले जाते. त्यावेळी संपत्ती जास्त भासवली जाते. पगार, जमीन जास्त सांगितली जाते. विशेषत: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हे प्रमाण जास्त आहे. मुलगी पाहायला जाताना, लग्न ठरवायला जाताना अलिशान वाहनातून जाऊन आकर्षण निर्माण केले जाते. त्यानंतर काही दिवसांनी लग्न होते. लग्नानंतर मुलगी जास्त पगार अथवा उत्पन्न असल्याप्रमाणे वागते. त्यामुळे तिच्या गरजा पूर्ण करताना पतीला तारेवरची कसरत करावी लागते. पुढे अपेक्षांची पूर्तता न झाल्याने दोघांत खटके उडायला सुरुवात होते.
तर कित्येकांना गंभीर आजार असतात. याची माहिती लग्नापूर्वी दिली जात नाही. लग्नानंतर याबाबत जोडीदाराला याबाबत कळते. यातूनही वाद होतात. अनेक प्रकरणांमध्ये शिक्षण कमी झालेले असताना जास्त सांगितले जाते. दुसर्या जोडीदाराकडून विश्वास ठेवून शिक्षणाच्या कागदपत्रांची पाहणी केली जात नाही. लग्नानंतर ही माहिती वादाला कारण ठरते.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोघांच्या आयुष्यात कोणी होते का, सुरू असलेल्या अथवा पूर्वीच्या अनैतिक संबंधाची माहिती लपविली जाते. हे वाद थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचतात. फसवणूक झाल्याची भावना असलेल्या जोडीदाराकडून घटस्फोटासाठी अर्ज केला जातो.
“लग्न ठरवताना केलेल्या यादीत पगार, संपत्ती अथवा शिक्षण या बाबींचा उल्लेख केलेला नसतो. त्यामुळे अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे सिद्ध करणे न्यायालयात अवघड बनते. त्यामुळे लग्न ठरवताना शिक्षण, पगार, आर्थिक बाबी, उत्पन्नाचे स्रोत तपासले पाहिजेत. यातून दोघांत वाद होणार नाहीत. तर, आजारपणाची माहिती लपवता कामा नये. लग्नानंतर होणार्या गंभीर परिस्थितीचा विचार करून समोरच्या पार्टीनेही खोटी माहिती देऊ नये.” – अॅड. आकाश मुसळे, माजी कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन.