पुणे – पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

आयुक्‍तांचे संबंधित विभागांना आदेश

पुणे – पावसाळी पूर्व कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या समस्या तातडीने निरस्त कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी संबंधित विभागांना दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठा, ड्रेनेज, घनकचरा व्यस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापन, पथ, विद्युत, अग्निशमनदल या विभागांचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. ही कामे अत्यावश्‍यक बाब असल्याने ती तातडीने पूर्ण करण्यास आयुक्‍तांनी मान्यता दिली आहे.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी मे महिन्यात तयारी सुरू केली जाते. त्यामुळे अनेक कामे अर्धवट राहून पावसाळ्यात नाले तुंबणे, ड्रेनेज स्वच्छ न झाल्याने शहरात जागोजागी पाणीसाठून कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. तसेच नागरिकांच्या रोषाचा सामनाही महापालिकेस करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन शहरातील खोदाई नंतरची रस्ते दुरुस्ती, नाले सफाई, ड्रेनेज सफाई तसेच इतर आवश्‍यक कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्यात प्रत्येक विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासह ही कामे पूर्ण करण्यासाठी निश्‍चित कालमर्यादा ठरविण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापनावर भर
पावसाळ्यात शहरात पुरस्थिती अथवा एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी तातडीने मदतकार्य सुरू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व तातडीने प्रतिसाद देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या दुर्घटनेनंतर बाधीतांना मदत देण्यात (निवास, तसेच जेवणाची सोय) करण्यासारख्या बाबीस उशीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने अशा सुविधा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी आधीच तयार करून आपत्तीजन्य स्थितीत त्यांना मदतीसाठी घ्यावे यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तसेच अशा स्थितीत पोलीस, अतिक्रमण विभाग, अग्निशमनदल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुनर्वसन विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या मदतकार्य करण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.