पुणे – 31 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण

‘आरटीई’ प्रक्रिया : प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे

पुणे – राज्यात “आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशाअंतर्गत पंधरा दिवसात 31 हजार विद्यार्थ्यांची शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित 50 टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप शाळांमध्ये प्रवेश घेतले नाहीत. प्रवेशासाठी 26 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून आणखी काही दिवसांसाठी मुदतवाढ मिळणार हे निश्‍चित आहे.

विविध जिल्ह्यांमध्ये 9 हजार 915 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या होत्या. यासाठी 2 लाख 44 हजार 934 पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या प्रवेशासाठी 8 एप्रिलला राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली आहे. यातून पहिल्या टप्प्यात 67 हजार 706 पालकांना लॉटरी लागली. प्रवेशासाठी या पालकांना ठराविक मुदत देण्यात आली आहे. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करुनच पालकांना मुलांना शाळांमध्ये प्रवेश करण्याची पुढची प्रक्रिया पूर्ण करता येते.

पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यात सलग आलेल्या सुट्टा, लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात गुंतलेले अधिकारी, कर्मचारी यामुळे अद्याप बऱ्याचशा पालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. पहिल्या टप्प्यात प्रवेश न मिळालेल्या काही पालकांनी प्राथमिक शिक्षण संचालनालय व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्याबाबतचे लेखी अर्जही त्यांनी दाखल केलेले आहेत. गूगल मॅपवरील लोकेशन चुकल्यामुळे 1 कि.मी.च्या आतील शाळांच्या लॉटरीसाठी काही पालक पात्रच ठरले नाहीत.

आतापर्यंत 31 हजार 375 विद्यार्थ्यांची शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 6 हजार 860, ठाण्यात 3 हजार 278, नाशिकमध्ये 2 हजार 134, नागपूरमध्ये 2 हजार 654, औरंगाबादमध्ये 1 हजार 431, रायगडमध्ये 1 हजार 244 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झालेले आहेत.

पालक व इतर काही संघटनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. यावर मुदतवाढ देण्याबाबत गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. किती दिवस मुदतवाढ द्यायची, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.