पुणे – क्‍लासचालकांमध्ये विद्यार्थी खेचण्यासाठी स्पर्धा

शाळांच्या बाहेर कचऱ्यासारखी पत्रके पसरली

पुणे – शहरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विविध वर्गांचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी क्‍लासकडे खेचण्यासाठी क्‍लासचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यांनी विविध पध्दतीद्वारे मार्केटींग राबविण्याचा धडाका लावला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात शिक्षणाचा बाजार मांडल्याचे यावरून अधोरेखित होत आहे. या क्‍लासेसच्या माध्यमातून भरभक्‍कम शुल्क आकारून उखळ पांढरे करण्याचा सपाटा लावला जात आहे. त्यामुळे शिक्षण पंढरी खजिल झाल्याचा प्रत्यय येत आहे.

शहरातील सर्व उपनगरांमध्ये शासकीय अनुदानित शाळा पूर्वीपासूनच आहेत. या शाळांबरोबरच गेल्या काही वर्षांत खासगी शाळांही मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. यात प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही अधिक प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते. या शाळांची फीही भरमसाठ असते.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सर्वच शाळांचे निकाल लागतात. या निकालांदिवशी शाळांबाहेर खासगी क्‍लासचालक व त्यांच्या प्रतिनिधीमार्फत पालकांना क्‍लासच्या माहितीची पत्रके वाटप करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. क्‍लासची माहिती पालक व विद्यार्थ्यांना सांगितलीे जात आहे. पालकांचे नाव, विद्यार्थ्यांचे नाव व वर्ग, मोबाइल नंबर यांची माहिती जमा करण्यात क्‍लासचालक व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. पालकांना वाटप केलेली क्‍लासची पत्रके शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्यासारखी पडल्याचे आढळून येऊ लागले आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनाच ही सफाई करावी लागत असल्याचे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. शाळांच्या आतमध्ये क्‍लासचालक व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.

शाळांच्या परिसरात गल्लोगल्ली क्‍लासेसचालकांनी आपली दुकाने थाटली आहेत. बहुसंख्य शाळांमधील शिक्षकांमार्फतच ही दुकाने चालविली जातात, हे उघड आहे. शाळांच्या बाहेर व घरोघरी, गर्दीच्या चौकांमध्ये, उद्याने, बाजारपेठा, बसथांबा या ठिकाणी क्‍लासची पत्रके पालकांना वाटप करण्यात येऊ लागली आहेत. यासाठी क्‍लासचालकांनी रोजंदारीवर कामगारांच्या तात्पुरत्या नियुक्‍त्याही केलेल्या आहेत. पालकांना वेगवेगळ्या ऑफरही दिल्या जाऊ लागल्या आहेत. वर्षभराची एकदम “फी’ भरणाऱ्या पालकांना “फी’मध्ये सवलतीही देण्याचे आमिष पालकांना दाखविण्यात येऊ लागले आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, मुले अभ्यासात गुंतून रहावीत यासाठी पालकही आपल्या मुलांना सोयीच्या ठिकाणी असलेल्या क्‍लासमध्ये प्रवेश घेतात ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.