पुणे : विमा काढल्यानंतर त्यांच्या प्रकाराबाबत चुकीची नोंद झाली आहे. त्यामुळे विमा काढण्याच्या वेळी सांगितलेली रक्कम देता येणार नाही, अशी भूमिका घेत ठरल्याप्रमाणे विम्याची रक्कम न देणे ‘एलआयसी’ला महागात पडले आहे. तक्रारदार ग्राहकाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि १० हजार रुपये तक्रार खर्च द्यावा, असा आदेश अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिली आहे.
याबाबत एरंडवणे येथे राहात असलेले प्रसाद कुंभोजकर यांनी दि. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) विरोधात आयोगात तक्रार दिली होती. आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख आणि सदस्या प्रणाली सावंत यांनी हा निकाल दिला. तक्रारदारांनी ‘एलआयसी’चा ‘पेन्शन प्लॅन जीवन सुरक्षा’ हा विमा घेतला होता. त्याचे सर्व हप्ते तक्रारदारांनी नियमितपणे भरले होते.
विम्याची मुदत संपत असल्याने तक्रारदारांनी पैसे मिळण्यासाठी पर्याय निवडत ठरल्याप्रमाणे पैसे देण्याचा पर्याय निवडला होता. ‘एलआयसी’ने पाठवलेल्या पत्राप्रमाणे तक्रारदारांना त्यांनी निवडलेल्या योजनेंतर्गत चार लाख ६४ हजार ५०४ रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र ‘एलआयसी’ने तीन लाख ९५ हजार २२१ रुपये दिले. त्यामुळे तक्रारदारांनी ‘एलआयसी’शी वारंवार संपर्क करून उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली.
रक्कमेचा परतावा करण्याबाबत पत्रात नमूद केलेली रक्कम रुपये ही संगणकातील तांत्रिक अडचणींमुळे चुकीची असल्याचे ‘एलआयसी’ने तक्रारदारांना कळविले होते. ‘एलआयसी’ ही सेवा सदोष असल्याने उर्वरित रक्कम, त्यावरील व्याज, नुकसान भरपाई आणि तक्रार खर्च मंजूर करण्याची मागणी करणारी तक्रार दाखल करण्यात आली होती.