पुणे – चाकण औद्योगिक परिसरातील एका कंपनीतील माजी अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी फेटाळला. अजित कुमार बिपिनबिहारी त्रिपाठी, असे त्याचे नाव आहे. चाकण औद्योगिक परिसरातील एका कंपनीत माजी उप-व्यवस्थापक म्हणून नोकरीस असलेल्या त्रिपाठीने कंपनी सोडून गेल्यावर त्याने कंपनीची गोपनीय माहिती असलेला सर्व डेटा चोरल्याचे कंपनीच्या आयटी टीमच्या निदर्शनास आले. चाकण पोलीस ठाण्यामध्ये कंपनीच्या वतीने मुनीश कुंदनलाल राठी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी नोटीस पाठविल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जास फिर्यादी कंपनीच्या वतीने विशेष नेमणूक असलेले अॅड. संदीप महादेव घाटे व सरकारी वकील पांडकर यांनी विरोध केला. डेटा चोरीसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जामिनावर मुक्त करता येत नाही, असा युक्तिवाद अॅड. घाटे यांनी केला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने कंपनीचा गोपनीय डेटा कुठे संकलित केलेला आहे.
याचा तपास करणे गरजेचे असल्याचे फिर्यादी कंपनीचे वकील अॅड. घाटे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणी अशा प्रकारच्या क्लिष्ट गुन्ह्यामध्ये आरोपीस कोठडीमध्ये घेतल्याशिवाय गुन्ह्याचा तपास करणे अशक्य आहे. यामुळे आरोपीस जामीन देता येणार नाही तसेच हा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचेही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.