शिवनेरी बॅंक होणार “पुणे कमर्शियल बॅंक’

रिझर्व्ह बॅंक संचालकांच्या उपस्थितीत रविवारी कार्यक्रम; 200 कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट

सातारा – शिवनेरी सहकारी बॅंकेचे नामकरण पुणे कमर्शियल को- ऑप. लि. असे करण्यात आले असून त्याची उद्‌घोषणा रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे करणार आहेत. त्यानिमित्त दि. 23 जून रोजी सायंकाळी पाच वाजता येथील पुष्कर हॉलमध्ये सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त सतीश सोनी, ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, बुलढाणा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राधेश्‍याम चांडक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे, संचालक विजयकाका चव्हाण, धनंजय पाटील उपस्थित होते. श्री. देशपांडे म्हणाले, “”बॅंकेची स्थापना 22 वर्षांपूर्वी करण्यात आली. या काळात उलाढाल वाढत गेली. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातील संकटेही पहिली. एवढ्या वर्षात बॅंकेचे स्वरूप लहान ठेवत ग्राहकांच्या विश्‍वासाला कायम पात्र राहिलो. बॅंकेच्या मुख्य कार्यालयासह पाच शाखा, चार हजार सभासद आणि 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होत आहे. पुढील काळात उलाढाल 200 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून बॅंकेचे नामकरण आणि विस्तार करण्याचा निर्णय सभासदांच्या मान्यतेने घेण्यात आला. त्याचबरोबर पूर्वीच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनेक बॅंका व पतसंस्थांच्या गैरव्यवहाराचा त्रास आम्हाला होऊ लागला. त्यामुळे संचालक व सभासदांच्या मान्यतेने नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

येत्या काळात बॅंकेचा विस्तार पुणे जिल्हयात करण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुण पिढीला अपेक्षित डिजिटल बॅंकेची सेवा देण्यात येणार आहे. केवळ कर्ज देणे व वसूल करणे इथपर्यंत मर्यादित न राहता महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन बचत गटांच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लघुउद्योजकांना देखील कर्जपुरवठा करण्यात येणार आहे, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)