Pune : प्राध्यापक भरतीबाबत महाविद्यालये उदासीन

पुणे -उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयात प्राध्यापक भरतीस मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही प्राध्यापक भरतीसाठी 109 महाविद्यालयांनी 532 पदांच्या भरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचा (एनओसी) मागणी प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाकडे सादर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी महाविद्यालयांमध्ये उदासिनता दिसून येत आहे.
राज्य शासनाने 2017 च्या विद्यार्थीसंख्येनुसार अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक या संवर्गातील 2088 पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव सादर करण्याचे वेळावेळी आवाहन केले होते. त्यासाठी मुदतवाढ दिली होती. मात्र, पदभरतीसाठी मंजूर असलेल्या पदांच्या भरतीसाठी 109 महाविद्यालयांनी अजूनही 532 पदांसाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचा ऑनलाइन प्रस्ताव सादर केलेला नाही. ना-हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर न झालेल्या पदांची संख्या एकूण पदभरतीच्या जवळपास एक चतुर्थांश आहे. त्यामुळे उच्च शिक्षण संचालकांनी परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना आता अखेरची मुदत दिली आहे.
पदभरतीसाठी मंजुरी न दिलेल्या अनेक अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त पद संख्येत विविध कारणांमुळे वाढ झाली आहे. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांकडून, तसेच नॅक “ए प्लस’ आणि “अ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांकडून पदभरतीसाठी मागणी प्राप्त होत आहे. त्यामुळे पदभरतीसाठी मंजुरी दिलेल्या महाविद्यालयांपैकी अद्यापही ना- हरकत प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव सादर न केलेल्या महाविद्यालयांना अंतिम संधी देण्यात येत आहे.
प्रस्ताव 15 जूनपर्यंत सादर करावेत
आतापर्यंत ना-हरकत प्रमाणपत्रासाठी मागणी प्रस्ताव सादर न केलेल्या महाविद्यालयांनी 15 जूनपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करावेत अन्यथा संबंधित महाविद्यालय पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागणीसाठी इच्छुक नसल्याचे गृहीत धरून मंजूर केलेली पदे अन्य महाविद्यालयांना किंवा संस्थांना वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला जाईल, असे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर यांनी स्पष्ट केले आहे.





