अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे माहिती अस्पष्ट
पुणे – आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या शीतयुद्धाचा परिणाम लसीकरणावर होत आहे. किती लस आल्या, किती दिल्या, त्याचे नियोजन काय याची स्पष्टताच नसल्याने या विभागात सावळा गोंधळच सुरू झाला आहे. हे युद्ध एवढे वाढले आहे की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आधीही लसींविषयीची माहिती मिळत नसल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी केली.
लसीकरण केंद्राची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे; त्यांना “क्लास टू’ दर्जाच्या अधिकाऱ्याला जोडून देण्यात आले आहे. त्यांच्याकडे वास्तविक महापालिकेला किती लसी मिळाल्या, त्यांचे वितरण किती झाले आणि तत्संबंधी माहिती ठेवणे हे काम आहे. तसेच ती माहिती लसीकरण केंद्रांची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी मागितली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजित बैठकीसाठी ही माहिती आवश्यक असल्याचे संबंधित अधिकाऱ्याचे म्हणणे होते. लसीच्या सद्यस्थितीविषयी माहिती असलेल्या “क्लास टू’ अधिकाऱ्याला दुपारपासून कॉल करून, मेसेज करून, निरोप पाठवून माहिती विचारत आहे, परंतु ती दिली जात नाही, अशी तक्रार लसीकरणाच्या प्रमुखांनी केली. त्यावरून पुन्हा वादाला तोंड फुटले.
या सगळ्या प्रकारात नेमकी लसीकरणाची आकडेवारीच स्पष्ट होत नसल्याने आणि कोणाचे चूक, कोणाचे बरोबर यावरच शंका निर्माण होत असल्याने हा सगळा वाद प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याकडे गेला. मात्र तेथेही “सोल्युशन’ निघाले नाही. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी दोघांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला आणि तसे पत्रही दिले.
आयुक्तांची मध्यस्थीही “फेल’
या आधीही अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याबरोबर झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत या दोन अधिकाऱ्यांची खडाजंगी झाली होती. त्यावेळी अग्रवाल यांनी हा वाद मिटवण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे नेले होते. आयुक्तांनीही ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही प्रयत्न निष्फळ झाल्याचे आजच्या या भांडणावरून स्पष्ट झाले.