पुणे: थंडीची चाहूल; किमान तापमान 15 अंशांवर

पुणे – शहर परिसरात किमान तापमानात घट झाल्याने हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळेच थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. पुढील काही दिवसांत शहरात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

याबाबत हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनूपम काश्‍यपि यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून पूर्णपणे माघारी फिरल्याने हवामान कोरडे झाले आहे. येत्या काही दिवसांत उत्तरेकडील थंड वारे राज्यात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील किमान तापमान आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, हवेच्या विसंगतीमुळे दि. 25 ते 28 ऑक्‍टोबर या कालावधीत दक्षिण मध्य महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ राहील.

याकाळात कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी किमान तापमानात घट होईल.’

दरम्यान हवमान विभागाच्या नोंदीनुसार, शनिवारी पुण्यातील शिवाजीनगर येथे कमाल तापमान 32.7 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

राज्यात नाशिक येथे सर्वात कमी म्हणजेच 14.6 इतक्‍या किमान तापमानाची नोंद घेण्यात आली. तर महाबळेशवर येथे किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.