पुणे – सीएनजी दरवाढीने पीएमपी मेटाकुटीला

पुणे – इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने “सीएनजी’ बसेसचा मार्ग अवलंबण्यात आला. मात्र, हाच मार्ग प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय खडतर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीएनजीच्या किमती प्रती किलो दीड रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला दिवसाला किमान 90 हजार रुपयांचा अतिरिक्त “भार’ सोसावा लागणार आहे.

यापूर्वी 53 रुपये 80 पैशांनी मिळणारा सीएनजी आता प्रति किलो 55 रुपये 30 पैशांना मिळणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात स्वत:च्या आणि भाडे तत्वावरील अशा 1 हजार 224 अशा सीएनजी बसेस आहेत. यासाठी दररोज 60 हजार किलोग्रॅम इतका सीएनजी लागतो. त्यासाठी यापूर्वी 32 लाख 28 हजार रुपये इतका खर्च करावा लागत होता. मात्र, सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने यापुढील कालावधीत प्रशासनाला 33 लाख 18 हजार रुपये इतका खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाला दररोज किमान 90 हजार तर महिन्याकाठी 27 लाख रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

यासंदर्भात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे म्हणाल्या, “इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात यश येत आहे, त्यामुळे शासनानेही अशा प्रकारच्या इंधनामध्ये प्रशासनाला सवलत देण्याची आवश्‍यकता आहे.’

असा वाढणार भार…!
सीएनजी बसेस – 1 हजार 224
दररोज लागणारा सीएनजी – 60 हजार किलोग्रॅम
सीएनजीवरील सध्याचा खर्च- 32 लाख 28 हजार
दरवाढीनुसार नवीन खर्च – 33 लाख 18 हजार
दिवसाला अतिरिक्त भार – 90 हजार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.