पुणे बंद…! पाच दिवसांचा लॉकडाऊन?

महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत होणार चर्चा

पुणे – शहरासह ग्रामीण भागांत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढल्याने बेड अपुरे पडत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि.10) व रविवारी (दि.11) असा दोन दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. आता यामध्ये आणखी तीन दिवस वाढविण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मंगळवारी व बुधवारी असे सलग दोन शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार(दि.12) पासून बुधवारपर्यंत (दि.14) लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर शनिवारी (दि,10) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

या प्रस्तावास मान्यता मिळाली तर जिल्ह्यात सलग पाच दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. दरम्यान संचारबंदीची वेळ सायंकाळी सहा ऐवजी रात्री आठ वाजता करण्याची मागणी होत आहे. तसेच व्यापारी वर्गाकडून दुकाने उघडण्याची मागणी होत आहे. त्यावरसुद्धा निर्णय होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील आठवड्यापासून आणखी कडक निर्बध लागू करण्यात आले. यामध्ये सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. खासगी कार्यालयांना घरातूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात 50 टक्‍के उपस्थिती करण्यात आली आहे.

तसेच वीकएंड लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. असे कडक निर्बंध लागू करूनही करोनाबाधितांची संख्या कमी होत नाही. शहरात रुग्णालयामंध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शनिवार (दि.10) ते बुधवार (दि.14) पर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

सोमवारी फक्‍त कार्यालयीन कामकाज आहे. त्यानंतर मंगळवारी गुढीपाडवा आणि बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची शासकीय सुट्टी असल्याने प्रशासन सलग पाच दिवस लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.