पुणे – एसएमएसद्वारे स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती

पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेत लोकसहभाग पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने महापालिकेचे स्वच्छ शहराचे मानांकन घसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांना या अभियानाची माहिती व्हावी तसेच लोकसहभाग वाढावा या उद्देशाने महापालिकेकडून एसएमएसद्वारे नागरिकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे असलेल्या सुमारे साडेसहा लाख मोबाइल क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक विभाग सहभागी व्हावा तसेच जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी या उद्देशाने याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. त्यासाठी राव यांनी सोमवारी बैठक घेतली.

स्वच्छ शहर स्पर्धेत महापालिकेचे मानांकन 10 वरून थेट 37 वर आले आहे. त्यामुळे या स्पर्धेत झालेल्या चुका दुरूस्त करून तसेच केवळ स्पर्धे पुरते शेवटचे तीन महिने सर्वेक्षण न घेता संपूर्ण वर्षभर हा उपक्रम हाती घ्यावा म्हणून आयुक्तांनी ही बैठक घेतली. त्यात केवळ एका विभागावर जबाबदारी न ठेवता सर्व विभाग प्रमुखांना या सर्वेक्षणाची कामे निश्‍चित करून देण्यात आली आहेत. त्यात, प्रामुख्याने लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील सुमारे साडेनऊ लाख मिळकतींची नोंद महापालिकेकडे असून त्यातील जवळपास साडेसहा लाख मिळकतधारकांचे मोबाइल क्रमांक पालिकेने संकलित केलेले आहेत. या क्रमांकावर पालिकेकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केवळ मिळकतकराबाबत संदेश पाठविला जातो. त्यानंतर या क्रमांकाचा काहीच वापर केला जात नाही. त्यामुळे या पुढे स्वच्छ सर्वेक्षणात या क्रमांकाचा वापर करून लोकसहभाग वाढविण्यासाठी नागरिकांना एसएमएसद्वारे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.