पुणे – कचरा वर्गीकरण करा, नाहीतर थेट कारवाई

पालिकेची आजपासून मोहीम; जनजागृतीसह दंडही आकारणार


100 टक्‍के कचरा वर्गीकरणाचे उद्दिष्ट

पुणे – ओला आणि सुका कचरा वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर आता कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. त्यासाठी सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच या कारवाईची जबाबदारी महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि सहायक आरोग्य निरीक्षकांवर देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे समन्वयक माधव जगताप यांनी दिली.

शहरात सध्या केवळ 55 ते 60 टक्‍केच कचरा वर्गीकरण केले जाते. त्यामुळे कचरा प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असून हे वर्गीकरण 100 टक्के व्हावे, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरात दररोज 2,100 ते 2,200 टन कचरा निर्माण होतो. त्यातील केवळ 55 ते 60 टक्के कचराच नियमितपणे वर्गीकरण केला जातो. त्यामुळे उर्वरित मिश्र कचऱ्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेस मोठी कसरत करावी लागते. त्यातच, कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण व्हावे, या उद्देशाने महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक नागरिकाला ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी बकेटचे वाटपही करण्यात आलेले आहे. त्यानंतरही वर्गीकरणाचा टक्का वाढविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता थेट नागरिकांवर कारवाईचा बडगाच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरूवात शहरातील मोठ्या सोसायट्यांपासून होणार असून त्यांच्याकडून पालिकेला कचरा देताना तो वर्गीकरण केला जातो, की नाही याची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, आरोग्य निरीक्षक आणि सहायक आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून शहरातील इतर भागातही अशाच प्रकारे तपासणी केली जाणार असून जे नागरिक वर्गीकरण करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही स्वतंत्र बैठक घेऊन या आरोग्य निरीक्षकांना देण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

जनजागृतीही करणार
स्वच्छ शहर स्पर्धेत महापालिकेचे मानांकन 11 वरून थेट 37 वर गेले आहे. त्यामुळे पालिका प्रशसनाने शहर स्वच्छतेचा विषय गांभीर्याने घेतला असून या अभियानात शहरात निर्माण होणारा कचरा 100 टक्के संकलन, 100 टक्के वर्गीकरण तसेच त्यावर 100 टक्के प्रक्रिया करणेही अभिप्रेत आहे. त्यामुळे या अभियानासह, महापालिकेकडून या मोहिमेत वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई करणे हा महापालिकेचा उद्देश नसून जनजागृती करून त्यांनीही शहराच्या स्वच्छतेसाठी हातभार लावावा, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे माधव जगताप यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here