पुणे – शहरातील हवामान बदलामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री हवेत गारवा असा वातावरणाचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत. मात्र, हे वातावरण आरोग्यासाठी चांगले नसून, नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. दरम्यान, मंगळवारी (दि. 7) शहरातील कमाल तापमान 39.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
मागील दहा दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आणि उष्णतेची लाट गायब झाली. पुणे शहरातही त्याचा परिणाम झाला असून, कमाल तापमान 6 अंशाने खाली आले. तीन ते चार दिवस तापमान 35 ते 36 च्या जवळपास होते. परंतू, पुन्हा तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. रात्री हवेत गारवा असला तरीही घरामध्ये नागरिक उकाड्याने हैराण होत आहे. पुढील दोन दिवसात शहरात दुपारी आकाश ढगाळ राहिल, सोसायट्याचा वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दि. 8, 10 आणि 11 रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.