मोबाइलमुळे गुन्हेगारीत पुणे शहर अव्वल!

पोलिसांकडे 13 हजार 357 गुन्ह्यांचे अर्ज

पुणे – महाराष्ट्र राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतून 20 हजार 274 गुन्हे मोबाइल आणि इंटरनेटमुळे झाले आहेत. त्यापैकी पुणे शहरामध्ये तब्बल 13 हजार 357 गुन्ह्यांचे अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. त्यातील 12 हजार 683 खटले सोडविण्यात आले, तर 674 खटले सोडवण्याचे बाकी आहेत, असा दावा आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी केला आहे.

पुणे शहर (13 हजार 357), ठाणे शहर (1 हजार 19), मुंबई (793), औरंगाबाद (630), नागपूर (477) अशी अनुक्रमे पाच शहरांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यासह कोल्हापूर, अमरावती, भंडारा, लातूर, नाशिक, जळगाव आदी शहरांमधील गुन्ह्यांची संख्या शेकड्यांमध्ये आहे. पुण्यामध्ये सर्वांत जास्त तर हिंगोलीमध्ये सर्वांत कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. केंद्राच्या वतीने समुपदेशक हर्षल पंडित यांनी या संदर्भातील माहिती मागविली असता ही बाब समोर आली, असे डॉ. दुधाणे यांनी सांगितले.

हल्ली शालेय वयातील मुलांकडे देखील मोबाईल आहेत. या माध्यमातून चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. या साधनांच्या अतिवापराने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मोबाइल आणि इंटरनेटमुळे झालेल्या गुन्ह्यांमध्ये आत्महत्या, खून आणि अपघातांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमधील अनेक गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत, असे दुधाणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.