पुणे – मागील आठ दिवसांत शहरात नवीन करोना बधितांचा आकडा घटत असून करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा दुपटीने वाढला आहे. त्यामुळे दि.9 ऑगस्टअखेर शहराचा रिकव्हरी रेट तब्बल 73.70 टक्क्यांवर गेला आहे. तर शहरात 23.97 टक्के सक्रीय बाधित असून शहराचा मृत्यूदरही 2.33 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दि.9 ऑगस्टअखेर शहरातील करोनाबाधितांचा आकडा 65 हजार 966 होता, त्यातील सुमारे 1,540 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 48,614 जणांनी करोनावर मात केली. गंभीर रुग्णांच्या संख्याही कमी होण्यास सुरूवात झाली आहे.
परिणामी, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याच्या तक्रारीही कमी होऊ लागल्या असून गृह विलगीकरणात असलेल्या बाधितांचा आकडाही वाढत असल्याने रुग्णालयांवरील कमी झाला आहे.
जम्बो कोविड सेंटरसाठी रु. 75 कोटींच्या खर्चास मान्यता
शहरातील करोनाग्रस्तांना बेड मिळत नसल्याने राज्य शासन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 3 जम्बो कोविड सेंटर उभारत आहे. सुमारे 1,600 रुग्णांची क्षमता असलेल्या या रुग्णालयांसाठी महापालिकेने आपल्या हिश्श्यांचे 75 कोटी रूपये देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिल्याची माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. त्यातील 50 कोटींची रक्कम पालिकेकडून अगाऊ स्वरुपात दिली जाणार असून 25 कोटी रुपयांचा निधी साहित्य तसेच इतर सेवांसाठी देण्यात येणार आहे.