समर्थ पोलिसांची कारवाई ; सव्वा तीन लाखाचा ऐवज हस्तगत
पुणे – घरफोडी करुन 3 लाख 18 हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांस 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात आले. ही कारवाई समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. याप्रकरणी मानाराम नसारामजी जौधरी(रा.राजेवाडी) यांनी फिर्याद दिली होती.
चोरी प्रकरणी रोहन सचिन घाडगे(19) , उमरान करीम शेख(19,रा.राजेवाडी,नानापेठ) यांना अटक करण्यात आली असून रोहनच्या सख्या अल्पवयीन भावास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे गंठण, चेन, मंगळसूत्र, अंगठी असे दहा तोळे सोन्याचे दागिने आणी दोन किलो वजनाची चांदी असा 3 लाख 18 हजार 750 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. चोरीला गेलेला 100 टक्के ऐवज जसाच्या तसा हस्तगत झाला आहे.
फिर्यादी मनाराम चौधरी वडिलांचे निधन झाल्याने सहकुटूंब घरास व दुकानास कुलूप लावून गावाला गेले होते. त्यांचे गजानन नावाने किराणा दुकान असून त्यावर रहाते घर आहे. चौधरी हे 4 जुन रोजी गावाला गेले होते ते 9 ऑगस्ट रोजी परत आले. यावेळी त्यांनी घराची पहाणी केली असता, त्यांना वरच्या मजल्यावरील गॅलरीचे ग्रील कापल्याचे दिसले. तसेच हॉलचा दरवाजाही उघडलेला दिसला. बेडरुममध्ये तपासणी केली असता, तेथील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच बेडरुमच्या कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे आढळले.
याप्रकरणी चौधरी यांनी तातडीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांना खबऱ्यांमार्फत घाडगे व शेख यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने दोघांवर पाळत ठेवली असता, ते दागिने विकायला जात असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेताना त्यांच्या जवळ चोरीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आढळल्या. यानंतर पोलीसी खाक्या दाखवून उर्वरीच चोरीचा मालही हस्तगत केला गेला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक विनायक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस कर्मचारी सुशील लोणकर, राजस शेख, संतोष काळे, निलेश साबळे, टिळेकर, साहिल शेख, अनिल शिंदे, सचिन पवार, सूरज घनवट, सुमीत खुटे, गणेश कोळी, स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने केली.
यातील एक आरोपी भंगार विक्री तर दुसरा केटरर्सकडे डिलिव्हरीचे काम करतो. दोघेही आरोपी फिर्यादीच्या घराशेजारीच रहातात. फिर्यादीचे घर अनेक दिवस बंद असल्याने त्यांनी चोरी करण्याचा कट रचला, यामध्ये एका आरोपीने त्याच्या अल्पवयीन भावालाही सहभागी करुन घेतले. आरोपींचे अगोदरचे कोणतेही रेकॉर्ड नाही.