पुणे(प्रतिनिधी) – पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीत आज (बुधवार) सकाळी रानगवा (Indian Gaur) दिसून आला. रानगवा दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर रानगवाला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं होतं. पण, अखेर त्या रानगव्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
कोथरूडमध्ये रानटी गवा शिरल्याची बातमी समजताच महात्मा सोसायटीच्या परिसरात अनेक बघ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये हा रानटी गवा काहीसा भेदरला. त्यातच रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान वनविभागाची त्याला धरण्याची धडपड आणि बघ्यांची झालेली गर्दी यामुळे रानगवा घाबरून सैरावैरा धावू लागला. यामध्ये रानगवा जखमी झाला होता आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. त्यानंतर दोन- तीनवेळा त्याला इंजेक्शन देण्यात आले.
यामुळे धावाधाव झाल्यामुळे घाबरून (धाप लागून) मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे देखील वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.