…मुसळधार पाऊस आणि आर्त किंकाळ्या

…मुसळधार पाऊस आणि आर्त किंकाळ्या

पुणे – रात्री मुसळधार पाऊस बरसत होता…यामुळे कानावर सतत टपोऱ्या धारा पडत असल्याचा आवाज येत होता. इतक्‍यात अचानक झोपडीच्या दिशेने काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला…त्यापाठोपाठ कामगारांच्या आर्त किंकाळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. यामुळे इमारतीतील सर्व विद्यार्थी धावतच झोपड्यांच्या दिशेने पळत गेले…तेथील दृश्‍य पहाताच काळजाचा थरकाप उडाला… झोपड्या सिमा भिंतीच्या आणि झाडांच्या मोठ्या फांद्यांखाली गाडल्या गेल्या होत्या. त्याखालून जीवाच्या अकांताने कामगार ओरडत होते. अंधार असतानाही काही विद्यार्थ्यांनी सिमा भिंतीवरून उड्या मारल्या तर काहींनी पलिकडच्या इमारतीच्या पुढच्या बाजूने जात ढिगाऱ्याकडे धाव घेतली.

हातानेच झोपड्यांचे पत्रे आणि ढिगाऱ्यावरील माती पटापटा बाजूला करायला सुरुवात केली. यावेळी ढिगाऱ्यात दबलेले आणि पत्र्यामुळे श्‍वास घ्यायला जागा मिळालेले चार कामगार आढळले. त्यांना ढिगाऱ्याखालून कसेबसे काढले. तोवर काहींनी पोलिसांना व अग्निशमन दलाला पाचारण केले होते. प्रथम चौकीतील दोन पोलीस कर्मचारी तेथे धावत आले. त्यानंतर लगोलाग इतर पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान दाखल झाल्याची माहिती मदत कार्य केलेल्या नागरिकांनी दिली.
                 

घटनास्थळी प्रथम धाव घेत वाचवले तिघांचे प्राण

घटना घडल्यानंतर सर्व प्रथम गोविंद महाडिक, सिद्धार्थ म्हसे आणि अमोल अरसुले हे तीन विद्यार्थी मदतकार्यास धावले होते. या तिघांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन पुरुष व एका महिलेचे प्राण वाचवले. यातील गोविंद महाडिक यांनी आपबितीचे वर्णन करताना सांगितले, आम्ही तिघेही एमसीएसचे विद्यार्थी आहोत. तिघेही रुममेट असून श्रीरामपूर गावातील आहोत. मागील दोन वर्षांपासून येथे राहतो. सोमवारी रात्री पाऊस पडत असल्याने प्रथम वीज पडली असेल असे वाटले.

मात्र, कामगारांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांच्या झोपड्यांकडे धाव घेतली. तेथे मातीच्या ढिगाऱ्याखाली झोपड्या गाडल्या गेल्याचे चित्र दिसले तसेच काही कामगार वाचवण्यासाठी आवाज देत असल्याचे आढळले. अंधार असतानाही आम्ही मोबाइल तोंडात धरून त्याच्या बॅटरीच्या उजेडावर मदत कार्य सुरू केले. पत्र्याखाली ढिगाऱ्यात गाडल्या गेलल्या दोन पुरुष व एका महिलेला कसेबसे बाहेर काढले.

दरम्यान, या घटनेची खबर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होतपर्यंत जखमींना खासगी वाहनाने रुग्णालयात पाठवले. कोंढवा येथील दुर्घटना दूरचित्रवाहिण्यांवर पाहिली होती. अशीच घटना आपल्या शेजारी घडल्याने कामगारांचे प्राण वाचविण्याचा विचार मनात आला. यामुळे अंधार असतानाही मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात मदतकार्य केले. याप्रकारे आयुष्यात पहिल्यांदाच कोणाचा तरी जीव वाचविण्याची संधी मिळाली.

रखवालदारसह दोघा दाजींनी घेतली घटनास्थळी धाव

विमा हरनोर हे व्हेन्यू कॉम्पलेक्‍स येथे रखवालदार म्हणून काम करतात. त्यांच्या इमारतीला लागूनच लेबर कॅम्प आहे. त्यांच्या घरी गावावरून त्यांचे दोन दाजी भेटायला आले होते. गावाकडच्या गप्पा-टप्पा मारून झाल्यावर पांघरुणावर पडणार तोच लेबर कॅम्पच्या दिशेने मोठा आवाज झाला. या आवाजाने इमारतीत राहणारे विद्यार्थीही खाली धावत पळत आले. लेबर कॅम्पकडे धाव घेतात सहा झोपड्या भिंत आणि झाडाखाली दबलेल्या आढळल्या. सुमारे दहा ते वीस विद्यार्थ्यांसह आम्ही तिघांनीही तेथे धाव घेतली. ज्या ठिकाणाहून आवाज येत होते, तेथे पहाताच दबलेले कामगार दिसले. इतरांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान येतपर्यंत मदत कार्य केले. त्यांच्या मदतीला बी. कॉमचा विद्यार्थी विशाल पारखी आणी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आदित्य हिंगेही धावून आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.