-40 ते 45 वाहन चोरी गुन्हे केल्याचे उघड : 27 दुचाकी जप्त
-70 हजार रुपयांची दुचाकी 5 हजार रुपयाला विकल्याचे उघड
पुणे – पुणे शहरातून दुचाकी गाड्या चोरून त्याच्यावर बनावट क्रमांक टाकून, बनावट आरटीओची कागदपत्रे तयार करून त्या गाड्यांची राज्यातील विविध भागात विशेषत: मराठवाड्यात त्या विक्री करणारी टोळीतील दोघांना गुन्हे शाखा, युनिट पाचने जेरबंद केली. त्या टोळीने 40 ते 45 गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यातील 27 गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी ते अवघ्या 5 हजार रुपयात विकत असल्याचे उघड झाले आहे.
शुभम विनोद भंडारे (वय 25, रा. लातुर, मूळ. परभणी) आणि चेतन रवींद्र हिंगमिरे (वय 26, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ. तासगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. युनिट पाचचे पोलीस हवालदार अमजद पठाण यांना माहिती मिळाली की, वाहन चोरणारे अट्टल गुन्हेगार हडपसर येथील काळेपडळ येथे येणार आहेत. त्यानुसार सोमवारी (दि. 29) तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार बुलेट गाडीवरून दोघे येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी बुलेटची माहिती घेतल्यानंतर ती परभणी येथून चोरली असल्याचे दोघांनी सांगितले.
पोलिसांनी सखोल चौकशी केले असता अनेक गाड्यांची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे बनावट आर.सी.बुक मिळून आले. शहरातून चोरी केलेल्या गाड्या लातुर, परभणी, नांदेड आणि मुखेड भागात जुजबी किंमतीत विकल्याचेही त्यांनी सांगितले. तिकडे पोलिसांची टीम पाठवून वाहने हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघांनी त्यांचे अन्य दोन साथीदार असल्याचे कबुल केले आहे.