हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
पुणे – बालेकिल्ला असलेल्या पुण्यात सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी सोमवारी शहर कॉंग्रेसची चिंतन बैठक होणार आहे.
कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 6 वाजता ही बैठक कॉंग्रेस भवन येथे होणार आहे. तसेच या बैठकीत पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात येणार असून सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना या बैठकीस बोलविण्यात आले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत विश्वजीत कदम, तर यंदा मोहन जोशी या दोघांनाही तब्बत 3 लाखांवर मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाच वर्षांनंतरही शहरात कॉंग्रेसला आपले आस्तित्त्व निर्माण करता आलेले नाही, हे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या मतांनी झालेल्या पराभवामुळे शहर कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चिंतेत आहेत, तर विधानसभेचे इच्छुकही चांगलेच धास्तावले आहेत. “निवडणूक काळातील वातावरण तसेच प्रचाराची स्थिती पाहता, जोशी यांचा किमान 30 ते 40 हजार मतांनी विजय होईल,’ असा अंदाज कॉंग्रेसकडून वर्तविण्यात आला होता. तर, “कोथरूडसह सर्वच विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसला मोठे मताधिक्य मिळेल,’ असाही दावा पक्षाकडून करण्यात येत होता. पण, प्रत्यक्षात सर्वच मतदारसंघांत पक्ष पिछाडीवर राहिला. त्यामुळे नक्की कोठे चुकले, पक्ष कशात कमी पडला, कोणी प्रचारात सहभाग घेतला नाही तर काहींनी हात राखून काम केले का? अशा सर्व बाबींची मीमांसा करण्यासाठी शहर कॉंग्रेसने सोमवारी सायंकाळी कॉंग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे.