पुणे – शहरातील दैनंदिन कामेही रखडत असल्याने नागरिकांना महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यानंतरही अनेक विभागप्रमुख तक्रारींची दखलही घेत नसल्याने नागरिक थेट आयुक्तांकडेच गर्दी करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेत तक्रार निवारण कक्ष सुरू केला जाणार आहे. ही माहिती आयुक्त डाॅ. राजेंंद्र भोसले यांनी दिली.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत हा तक्रार निवारण कक्ष असेल. महापालिकेचे काही विभाग प्रमुख, क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी तसेच परिमंडळ उपायुक्त या ठिकाणी ठरलेल्या दिवशी उपस्थित राहून नागरिकांची निवेदने घेतील. तसेच संबंधित विभागांना पाठवतील. त्यानंतरही नागरिकांना तक्रार मांडायची असल्यास त्याचे गांभीर्य आणि स्वरूप लक्षात घेऊन ती अतिरिक्त आयुक्तांकडे मांडली जाईल, तसेच त्याची सोडवणूक न झाल्यास नागरिकांना आयुक्तांनाही भेटता येईल.
आॅनलाइन यंत्रणा कुचकामी
शहरातील नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारी करता याव्यात यासाठी महापालिकेकडून “पीएमसी केअर’ तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. तसेच महापालिकेचे हेल्पलाइन क्रमांकही आहेत. त्यावर तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्याऐवजी त्या बंद केल्या जात असल्याची स्थिती आहे.
“नागरिकांच्या तक्रारी स्थानिक पातळीवर न सुटल्यास ते महापालिकेत येत आहेत. मात्र, सर्वांनाच वेळ देणे शक्य होत नाही. प्रत्येक तक्रारीचे स्वरुप वेगळे असते. ही बाब लक्षात घेऊन तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे.” – डाॅ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.