पुणे – सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात बॅरीकड कामातील लोखंडी सळ्या (गज) वर आलेल्या असून त्या उघड्या असल्याने त्या धोकादायक ठरत आहेत. या रस्त्यावर आधीच पुलाच्या कामासाठी बॅरीकेडींग केलेले असल्याने ज्या भागात वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी या सळ्या रस्त्यावर एक ते दिड फूट वर आल्या आहेत.
अवजड वाहनांच्या धक्क्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याचा धोका असून चालकांच्या जीवाला धोका आहे. मात्र, ही बाब माहित असूनही प्रशासन तसेच उड्डाणपुलाच्या ठेकेदाराकडून या प्रकाराकडे सोयीस्कर दूर्लक्ष करण्यात येत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर महापालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजारामपूल ते फनटाइमपर्यंत उड़डाणपूल उभारण्यात येत आहे. यात दोन पूल असून एका पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे तर दुसऱ्या पुलाचे काम ७० टक्के झाले असून त्याचा रॅम्प तयार करण्याचे काम सुरू आहे. राजाराम पुलाकडून धायरीकडे जाताना विठ्ठलवाडीच्या समोर सुरू असलेल्या रॅम्पच्या भिंतीच्या खालील बाजूस सुमारे १० मीटर अंतरात रस्त्याच्या बॅरीकडेसाठी ठोकण्यात आलेल्या लोखंडी सळ्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्षात बॅरीकडे काढण्यात आल्यानंतर त्या काढणे अपेक्षीत असताना मागील आठ दिवसांपासून या सळ्या तशाच असून पुलाचे काम सुरू असताना सरळ-सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे चित्र आहे.
“ही बाब निदर्शनास आल्यानंतर तत्काळ या सळ्या काढण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. तसेच, वाहतुकीस अडथळा होणार नाही तसेच नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही, अशा प्रकारे काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.” – युवराज देशमुख, प्रकल्प विभाग प्रमुख