पुणे – मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा

विभागीय आयुक्त यांचे नागरिकांना आवाहन

पुणे – मतदानाच्यावेळी मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी उपयोगी आहे, मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत आहे का? याची प्रत्येकाने खात्री करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) उपलब्ध आहे. सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना व जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन-आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या आहेत.

येत्या शनिवार आणि रविवारी होणाऱ्या विशेष मोहिमेची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.

ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)