पुणे – मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. तर अपघातात दाम्पत्य जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागात घडली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीपाली वैभव बर्गे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात पार्वती आदिनाथ वायदंडे (वय ५०, रा. साईराज बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) आणि त्यांचे पती आदिनाथ जखमी झाले. पार्वती यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपाली या त्यांची मैत्रीण पार्वती, पती आदिनाथ शनिवारी रात्री आठच्या सुमारास मांगडेवाडी परिसरात रस्त्यालगत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कात्रज घाटातून भरधाव आलेल्या टेम्पोने या सर्वांना धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला.
नागरिकांनी या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दीपाली यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी पाहणी करीत टेम्पाेचालकाचा शोध घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहेत. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.