पुणे – मोटार वाहन विभागाविरुद्ध आरोपांच्या फैरी

पुणे – महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडील कंत्राटी कामांबाबत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले असतानाही तत्कालिन विभागप्रमुख किशोर पोळ यांनी कारवाई केली नाही. या कामाची फेरनिविदा काढणे आवश्‍यक असताना ती काढली नाही, असा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालिकेच्या मोटार वाहन विभागाकडील कंत्राटी कामांबाबत नरेंद्र तांबोळी यांनी तकार केली. त्यावर अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत चौकशी समिती नेमून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या कामासाठी मे. श्री एंटरप्रायजेस, जयभवानी एंटप्रायझेस, विशाल एक्‍सपर्ट सर्व्हिसेस प्रा.लि., आर.डी. कॉन्ट्रक्‍टर ऍन्ड सप्लायर्स या चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यात एकदा अपात्र करण्यात आलेल्या ठेकेदाराला पात्र करण्याची किमया तत्कालीन विभाग प्रमुखांनी केली होती. त्यामुळे आर.डी. कॉन्ट्रॅक्‍टर ऍन्ड सप्लायर्सकडून 1 कोटी 12 लाख 35 हजार 643 रु. , विशाल एंटरप्राईजेसकडे एकूण 49 लाख 76 हजार रु., अश्‍वमेघ असोसिएट्‌स 11 लाख 18 हजार रु. , श्री इंटरप्राईजेस 20 लाख रु. असे एकूण 1 कोटी 93 लाख 43 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी विशाल एंटरप्राइजेज यांची अनामत रक्कम जप्त करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते. पण, या आदेशाला पोळ यांनी केराची टोपली दाखविली. त्यासाठी तारीख बदलण्यात आली. या ठेकेदाराविरोधात पोळ यांनी खोटी माहिती दिल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल केला होता. पण, हा केवळ फार्स असल्याचे चौकशी समितीच्या लक्षात आले. त्याचबरोबर ठेकेदाराला अपात्र केले असूनही मुदतवाढीनंतर त्यास पात्र करुन त्याचे “ब’ पाकिट उघडण्यात आले. या कामाबाबत आलेल्या सर्वांत कमी दराच्या ठेकेदाराने काम करण्याबाबत असर्मथता दर्शविल्याने बयाणा रक्कम जप्त करुन फेरनिविदा काढणे आवश्‍यक होते. या ठेकेदाराला अदयापही काळ्या यादीत टाकण्यात आलेले नाही. या कामातील कामागारांना किमान वेतन, बोनस कमी प्रमाणात दिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तत्कालिन विभाग प्रमुख किशोर पोळ यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे, असे कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.