पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या इतिहासात प्रथमच अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना एकमेकांवर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. २२) घडला. या प्रकारानंतर सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. शाब्दीक वादावादी आणि हमरी-तुमरी करणाऱ्या दोन्ही सदस्यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत या विषयावर पडदा टाकला.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनावर टीका करताना एका अधिसभा सदस्यानी असंसदीय शब्दांचा वापर केल्याच्या कारणावरुन विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत अधिसभा सभागृहातच ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकाराने सभागृहात गोंधळ उडाला आणि काही काळासाठी कुलगुरुंनी ही अधिसभा स्थगित केली.
पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेला सकाळी ११:०० वाजता मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात सुरूवात झाली. अधिसभेच्या सुरूवातीला कुलगुरूंकडून विद्यापीठाच्या कार्यअहवालाचे वाचन करणे अपेक्षित असताना अधिसभा सदस्यांच्या मागणीनुसार स्थगन प्रस्तावांवर चर्चा सुरू झाली. सुरूवातीपासूनच अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांवर गंभीर आरोप केले. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरुन अधिसभा सदस्यांनी काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांवर कार्यपद्धतीवर टीका केली.
अधिसभा सदस्यांकडून सरसकट आरोप होत असल्याने व्यथित झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकबोटे म्हणाल्या की, व्यवस्थापन परिषदेला टार्गेट करण्याचा अजेंडा अधिसभा सदस्यांचा दिसतो आहे. सरसकट सगळ्यांना दोषी धरणे चुकीचे आहे. बोलताना काळजी घ्या, असेही त्या म्हणाल्या. बागेश्री मंठाळकर म्हणाल्या की, सर्व सदस्य चुकीचे काम करीत नाही. जे दोषी आहेत त्यांचे नाव घेऊन आरोप करा. आम्ही एक जबाबदारी घेऊन या पदांवर काम करतोय, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, सागर वैद्य यांनी झालेल्या आरोपांना उत्तर देत असताना अधिसभा सदस्य अशोक सावंत आणि वैद्य हे एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जवळपास दीड तास हा गोंधळ सुरू होता. कुलगुरू डॉ. गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
दिलगिरीनंतर आंदोलन मागे…
अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांनी महिला कर्मचाऱ्यांवर वापरलेल्या असंसदीय शब्दामुळे त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणात कुलगुरूंना दोन-तीन वेळा हस्तक्षेप करावा लागला. अखेर गोरडे यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
पुरस्कारांच्या खैरातीवर…
विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसाठी प्रशासनाची झालेली पळापळ, जीवनगौरव पुरस्कारांच्या खैरातीवर अधिसभा सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. सदस्यांना विचारात न घेता तसेच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या मर्जीतील व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जात असून, यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.