पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, बस व व्हॉन चालक या सर्वांनाच कसरत करावी लागत आहे. काही खासगी विनाअनुदानित शाळांनी शासनाच्या या आदेशालाही केराची टोपलीच दाखविली आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या होत्या. त्यावर अभ्यास करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणप्रेमी, पालक, तसेच अधिकाऱ्यांचे अभिप्राय घेतले होते.
त्यानंतर शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी ९ वा. किंवा त्यानंतर ठेवावी लागत आहे. यामध्ये अध्ययन व अध्यापनाचा कालावधी कमी होणार नाही, वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याकडेही शाळांना लक्ष द्यावे लागणार आहे.
पुणे महापालिकेच्या २७२ शाळा आहेत. त्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या १४१ शाळांची वेळ बदलण्यात आली असून सकाळी ९ ते दुपारी ३.३० अशा एकाच सत्रात या शाळा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. उर्वरित शाळांसाठी सकाळी ७ ते दुपारी १२.१५ व दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० अशी दोन सत्रे आहेत.
शाळांच्या भौतिक सुविधा, वर्ग खोल्या, उपलब्ध शिक्षक व कर्मचारी संख्या या सर्वांचा विचार करुन शाळांच्या वेळा बदलाव्या लागत आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकिय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिली आहे.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच
काही खाजगी विना अनुदानित शाळा आठवड्यापुर्वीस सुरु आलेल्या आहेत. महापालिका व अनुदानित शाळा मात्र शनिवारी ( दि.१५) सुरु झाल्या. रविवारी सुट्टी त्यानंतर सोमवारी बकरी ईदची सुट्टी अशी सलग सुट्टी आल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच होती. काही खाजगी शाळांनी तर थेट मंगळवारीच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.