पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप- महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ बाणेर-बालेवाडी भागात बाइक रॅली काढण्यात आली. या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाणेरकरांकडून या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पाटील यांनी बैलगाडीचेही सारथ्य करत साऱ्यांचे लक्ष वेधले.
या बाइक रॅलीचे आयोजनभाजप कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने करण्यात आले होते. मोझे कॉलेज, साई चौक, ममता चौक, दसरा चौक – बालेवाडी गावठाण, बालेवाडी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, बालेवाडी भीमनगर, पाण्याची टाकी, लक्ष्मीमाता मंदिर, चाकणकर मळा, बालेवाडी फाटा, माधवबाग, छत्रपत्री शिवाजी महाराज स्मारक, बाणेर गावठाण, दत्तमंदिर, राघुनाना चौक मुरकुटे गार्डन, युतिका सोसायटी – चांदेरे चौपाटी, अंजोर सोसायटी अशा मार्गे ही रॅली पुढे गेली. माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयजवळ रॅलीचा समारोप झाला.
ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि पुष्पवृष्टीने ठिकठिकाणी पाटील यांचे स्वागत करण्यात आले. अनेक चौकांमध्ये महिलांकडून औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या. भाजप उत्तर मंडलाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.