पुणे – कोथरूडकरांच्या समस्या सोडविणारा, विकासाला गती देणारा आणि ३६५ दिवस नागरिकांसाठी सहज उपलब्ध होणारा हक्काचा माणूस आपल्याला पाहिजे असेल, तर चंद्रकांत मोकाटे यांना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून द्या. तेच आपल्या हक्काचे आणि हाकेला साथ देणारा उमेदवार आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
कोथरूड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात रॅली पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात झाली.
या वेळी उमेदवार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, विकास पासलकर, माजी नगरसेवक शिवा मंत्री, दामू कुंबरे, नंदू घाटे, आपचे डॉ. अभिजित मोरे, अर्बन सेलचे अध्यक्ष स्वप्निल दुधाणे, रवींद्र माझिरे, गिरीश गुरनानी, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ५० वर्षे झाली. तो अजूनही दिमाखात उभा आहे, तर सिंधुदुर्गातील पुतळा आठ महिनेही टिकला नाही, ही शोकांतिका आहे. एवढेच काय तर चप्पल, शर्ट, मोबाइल जसे विकत घेऊ शकतो, तसेच आमदार आणि मंत्रीसुद्धा विकत घेता येतात, हे भाजपने दाखवून दिले. त्यामुळे आता जनतेने दाखवून द्यावे, की चुकीला माफी नाही. या वेळी आयोजित रॅली आणि पदयात्रेला नागरिकांनी हातात मशाल घेऊन कोथरूड परिसर शिवसेनामय केला.