पुणे : राज्यातील चार कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी दि. २३ ते २५ मे या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी दि. १० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या सीईटीचा निरकाल १० जूनला प्रसिद्ध होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांतील विविध विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदवीधर आणि २०२४-२५मध्ये अंतिम वर्षातील पदवी परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाकडून देण्यात आली.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज http://www.mcaer.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्यासाठी १२ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र १४ मेपासून उपलब्ध करून दिले जातील. परीक्षेतील पात्र, अपात्र उमेदवारांची यादी १८ ते २० मार्च या कालावधीत प्रसिद्ध केली जाणार आहे. सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.