अंडाशय कर्करोग जागरूकता महिना
पुणे – “ओव्हरीज कॅन्सर’ अर्थात अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याविषयी जनजागृतीचा अभाव, उशिराने निदान आणि उपचारांमुळे हे प्रमाण भारतात वेगाने वाढत आहेत. “डॉक्टरांच्या शिफारशीनुसार 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांनी सीए-125 रक्त चाचणी आणि ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड करून घ्यावे.
“ओव्हरीज कॅन्सर’ हा भारतीय महिलांमध्ये तिसरा सर्वांत सामान्यपणे आढळणारा कर्करोग आहे आणि सामान्यतः 55-64 वयोगटात हा कर्करोग दिसून येतो. भारतात कर्करोगाच्या सर्व मृत्यूंपैकी 3.34% मृत्यू हे “ओव्हरीज कॅन्सर’मुळे होतात.
भारतातील प्रत्येक 1 लाख महिलांमध्ये 0.9-8.4 च्या घटना या अंडाशयाच्या कर्करोगाचे आढळून येतात. हा कर्करोग म्हणजे एक घातक ट्युमर असून तो स्त्रीचे अंडाशय, आणि ओटीपोटाच्या अवयवांमध्ये आणि एखाद्याच्या उदर आणि फुप्फुसातदेखील पसरतो.
बहुतेक प्रकरणांचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा शेवटच्या टप्प्यात होते. सुरुवातीच्या टप्प्यातील केवळ 15% प्रकरणांचे निदान करण्यात येत आहे. वेळेवर महिला उपचारासाठी येत नसल्याने निदानास उशीर झाल्यास उपचार करणे अवघड होते. या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होते. जगण्याचा दर हा 94% आहे.
या कर्करोगाचे निदान करण्यासाठी निश्चित तपासणी तंत्र नाही. एक नियमित तपासणी ज्यात “ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड’ आणि “सीए 125′ रक्तचाचणी समाविष्ट आहे. या तपासणीद्वारे कर्करोगाचे निदान करता येते.
कारणे काय?
गर्भधारणा न होणे, कमी वयात मासिक पाळी सुरू होणे, उशिरा रजोनिवृत्ती, पहिली गर्भधारणा उशिराने. म्हणजेच वय 35 वर्षांपेक्षा जास्त असणे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, तंबाखू सेवन, धूम्रपान आणि कौटुंबिक इतिहास आदी.
आजार टाळण्यासाठी
महिलांनी दररोज व्यायाम करावा. संतुलित आहार घ्यावा. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे. स्तनदा मातांनी बाळाला नियमित स्तनपान करावे.
लक्षणे काय?
ओटीपोटात दुखणे, सूज येणे किंवा वारंवार मूत्रविसर्जन, अचानक वजन कमी होणे, थकवा येणे, आतड्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होणे आदी.