पुणे : व्यावसायिकाने रस्त्याकडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड पळवली. ही घटना विमाननगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नितेशकुमार राजकुमार शहा ( ३४, रा. चारकोप, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे कामानिमित्त मुंबईहून आले होते. विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली.
चोरट्यांनी कारची काच फोडली. पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.
…तीन दिवसांपूर्वीही झाला होता प्रयत्न
शहा हे बड्या विवाहसमारंभांचे डेकोरेशन करतात. त्यांनी चार दिवसांपूर्वी कामगारांचे पगार करण्यासाठी ४० लाखांची रोकड काढली होती. तीन दिवसांपूर्वी ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, तेव्हा त्यांच्या गाडीची काच फोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, कारचा अलार्म वाजल्याने ते धावत गेले. तेव्हा एका दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला. दरम्यान, घटनेच्या दिवशी ते एका उद्योगपतीच्या मुलीच्या विवाह समारंभाचे डेकोरेशन करत होते. त्याचे घेऊन येणारे ट्रक आल्याने तेथे अडथळा ठरत असलेल्या सीसीटीव्हीच्या वायर हलवण्यात आल्या होत्या. यामुळे सीसीटीव्हीत घटना कैद झाली नाही.