करोना मृतांच्या आकडेवारीत महापालिकेची लपवाछपवी?

पुणे, दि. 28 -करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष लपवाछपवी करत असून या आकडेवारीबाबत आयुक्‍तांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

याबाबतचे पत्रक माजी आमदार, प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिले आहे. करोना नियंत्रणात भाजपला अपयश आले आहे. विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग प्रमुखांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत आढळते. विद्युत विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य अभियंत्यांनी मृत्यू झालेल्यांची आकडेवारी आणि अंत्यविधीसाठी दिलेले पास यात एवढी तफावत कशी? आयुक्‍त विक्रम कुमार यांनी उच्चस्तरीय चौकशी करून गेल्या पंधरवड्यातील करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या किती होती, हे जाहीर करावे, असे पत्रकात म्हटले आहे.

हा प्रकार भयावह
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यात रोज वेगवेगळी विधाने करत आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अपयशाबद्दल ते अवाक्षर काढत नाहीत. करोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी लपवण्याचा भयावह प्रकार महापालिकेतील सत्ताधारी करत आहेत. भाजपच्या या कारभाराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी उत्तर द्यावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.