पुणे : ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नवीन निवासी इमारत बांधली जात असून या कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे. त्यासाठी, या भागाचा आमदार म्हणून पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावल्याचा विशेष आनंद असल्याच्या भावना कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप, महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी व्यक्त केल्या. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने या आमदार कांबळे यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
कांबळे म्हणाले, या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या साथीने रुग्णाला जीवदान देणाऱ्या, अहोरात्र रुग्णांसाठी झटणारे रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा तेवढेच मेहनती असतात. या चतुर्थ श्रेणी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता असलेली वसाहत अतिशय जीर्ण झालेली होती बाब लक्षात घेऊन इमारत बांधणीचा सुमारे २८ कोटी रुपये खर्च शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेता आला.
“आम्ही १९९९ पासून सोमवार पेठेतील ससुन कर्मचारी वसाहतीत रहात आहे. ही वसाहत १९९२ मध्ये निर्माण झाली होती. या वसाहतीत १२० कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहेत, या इमारती जीर्ण झाल्याने आम्हाला वसाहत सोडण्यास नोटिस देऊन सांगण्यात आले, आमच्या पुनर्वसनांची कोणतीही सोय करण्यात आली नाही. आमदार सुनील कांबळे यांनी २०१९ मध्ये या प्रकरणात लक्ष घातले आणि आज आमचा प्रश्न सुटला आहे.”
– संजय निमजाते ( स्थानिक रहिवासी )
त्यामुळे रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स , कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरता अत्याधुनिक सोई सुविधा युक्त निवासस्थानाची सोय होणार असल्याचा विशेष आनंद आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी विधानसभा सत्रामध्ये विशेष मागणी केली. निधीची तरतूद करून घेतली आणि हे बांधकाम पूर्ण करून घेतले.