पुणे : पथविक्रेत्यांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी तसेच पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा रोजगार मिळून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पथविक्रेता, उपजीविका, सरसाधनांचे रक्षण या कायद्यांतर्गत पथविक्रेता योजनेची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार असून निवडून आल्यानंतर पथविक्रेते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी विशेष उपाय योजना केल्या जाणार असल्याची ग्वाही कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी सोमवारी दिले.
मतदारसंघातील पथविक्रेत्यांची रमेश बागवे यांनी सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. जाणीव संघटना प्रणीत जाणीव हातगाडी, फेरीपथारी आणि स्टॉलधारक संघटनेने कार्यवाह संजय शंके यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश बागवे यांना पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या अध्यक्षा श्वेता ओतारी, उपाध्याय कैलास बोरगे, विभागीय अध्यक्ष विनायक दहीभाते, विभागप्रमुख विशाल खुडे व जगन्नाथ घोलप आणि भवानी पेठ विभागप्रमुख किशोर शिंदे यांनी पाठिंब्याचे पत्र रमेश बागवे यांना दिले.
पथविक्रेता कायदा, पथविक्रेता योजना, पथविक्रेता धोरणाची कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात अंमलबजावणी व्हावी, यासाठी रमेश बागवे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे ओतारी यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने बागवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर बागवे यांच्या प्रचारार्थ रास्तापेठ येथे पदयात्रा काढण्यात आली यावेळी काॅग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, सुजाता शेट्टी, प्रा. वाल्मीकी जगताप, राजीव अरोरा, अशोक लांडगे, वैष्णवी किराड, मुन्ना खंडेलवाल, सुजित जाधव, असिफ शेख, विठ्ठल थोरात, रवि आरडे, विजय वारभवन, सय्यद शेख, नुरुद्दीन सोमजी उपस्थित होते.