लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ आणखी 6 महिन्यांनी वाढला
पुणे – पुण्यासह देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संरक्षण मंत्रालयाने सहा महिन्यांनी वाढवला आहे. दुसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका लांबणार आहेत, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
करोना परिस्थितीमुळे संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंत्रालयाने दि. 4 ऑगस्ट रोजी परिपत्रक जाहीर केले आहे. लष्कराच्या चार मुख्यालयांना हे परिपत्रक पाठवण्यात आले असून, बोर्ड सदस्यांचा कार्यकाळ दि.10 ऑगस्टनंतर सहा महिन्यांपर्यंत म्हणजे दि.10 फेब्रुवारीपर्यंत वाढवल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.
पुणे, खडकी बोर्डांसह 56 कॅन्टोन्मेंटचा पंचवार्षिक कार्यकाळ दि.10 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला होता. तो संपण्यास पाच दिवस बाकी असताना, संरक्षण मंत्रालयाने या सर्व बोर्डांना सहा महिने मुदतवाढ देत सदस्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टपर्यंत वाढवला होता. मात्र, आता ही मुदत आणखी वाढल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक नेतेमंडळींना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.